खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत मनात असते

COLOR-BRAIN-297x300
गुन्हेगार सहजासहजी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाहीत. गुन्हा कबूल करण्यासाठी विविध पद्धती राबवल्या जातात. प्रसंगी गुन्हेगारांना शारीरिक मारहाण व मानसिक छळ केला जातो. व्यक्तीचा खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत माणसाच्या सुप्त मनात असते असे एका संशोधनात आढळले आहे.
अट्टल खोटे बोलणा-या व्यक्तींकडून खरे काढून घेणे सोपे नसते. मात्र, त्यांच्या सुप्त मनाचा मागोवा घेतल्यावर त्यांचा खोटेपणा उघड होऊ शकतो. व्यक्ती खरी बोलते की खोटे यासाठी ‘लाय डिटेक्टर’ टेस्ट घेतली जाते. मात्र, या टेस्टच्या यशस्वीपणाची खात्री केवळ ५४ टक्के असते. स्वत: व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत याबाबत माणसे ही अत्यंत संवेदनशील असतात, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लीन टेन ब्रिंके यांनी सांगितले. त्यांच्या या संशोधनात डायना स्टिमसन, डाना कार्नी यांनी सहभाग घेतला होता.
या संशोधकांनी नवीन चाचणी विकसित केली आहे. एखादी व्यक्ती खोटे बोलत असल्यास सुप्त मन ते ओळखू शकते. विशेष म्हणजे सुप्त मन हे ओळखण्यात अपयशी ठरल्यावरही ही चाचणी यशस्वी होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.या संशोधनासाठी ७२ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यांना संशयित आरोपींच्या मुलाखतींची चित्रफीत दाखवण्यात आली. काही व्यक्तींनी पुस्तकातून १०० डॉलर्स चोरले होते. मात्र या चोरीची कबुली मुलाखत देणा-यांना देऊ नये असे बजावले होते. आरोपींमध्ये काही जणांना खरे बोलण्यास सांगितले तर काही जणांना खोटे बोलण्यास सांगितले. त्यानंतर या ७२ जणांना मुलाखतीतील व्यक्तींचा खरे-खोटेपणा सिद्ध करण्यास सांगण्यात आले. त्यांनी तत्काळ ४३ टक्के जण खोटे बोलत असल्याचे सांगितले तर ४८ जण खरे बोलत असल्याचे सांगितले. या चाचणीचे निष्कर्ष ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्यक्तीचे सुप्त मन खरी माहिती देत असते, असे चाचणीत आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 4 = seven