खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा

vishbadha_1428793753
हिंगोली – मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे तालुक्यातील समगा येथील जिल्हा परिषद शाळेतील ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना हिंगोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली असून ७५ जणांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
समगा येथील जिल्हा परिषद शाळेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी आणि वाटाणे देण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थ्याने खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्याने ९५ विद्यार्थ्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब रोडगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे आदी डॉक्टरांनी ताबडतोब विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. एक तासाच्या उपचारानंतर त्यातील २० विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जास्त बाधा झालेल्या ७५ विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना सुटी देण्यात येणार आहे. डॉ. रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. या प्रकरणी डॉक्टरांनी खिचडी आणि वाटाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 8 = fifty six