
रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील भोस्ते घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री रसायनाने भरलेला एक टॅंकर दरीत कोसळला. हा टॅंकर कोसळल्यानंतर दोन ते तीन स्फोट झाले. या स्फोटाचे आवाज काही कि.मी.पर्यंत ऐकू आले. मोठे स्फोटाचे आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. या दुर्घटनेत टॅंकर चालकाचा मृत्यू झाला.
खेड, चिपळूण आणि लोटे एमआयडीसीमधील अग्निशमन दलाच्या गाडयांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. आग आता विझवली असली तरी, वायूगळती थांबलेली नाही. घरडा कंपनीचा हा टॅंकर असून, कंपनीच्या तज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन टॅंकरची पाहणी केली.
मुंबई-गोवा महामार्ग सध्या कोकणात जाणा-या चाकरमान्यांमुळे व्यस्त महामार्ग बनला आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशीही मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जात होते. या अपघातामुळे त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. दरम्यान गणेशोत्सवात मोठया संख्येने चाकरमनी कोकणात जातात त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी जड वाहनांना या मार्गावर बंदी असताना, ज्वलंत रसायनाने भरलेला हा टॅंकर इथे कसा आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.









