बीड- महाराष्ट्रात झालेली गारपीट ही अत्यंत भीषण आहे. उभ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिलेली नाही. या गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतक-यांना उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत देण्याचा आपला प्रयत्न असून त्यात निवडणुकीची आचारसंहिता आडवी येणार नाही, असा दिलासा केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गारपिटग्रस्त शेतक-यांना दिला.
आचारसंहिता लागू झाली असली तरी प्रचंड नुकसान झालेल्या गारपिटग्रस्तांना निवडणूक आयोगाच्या परवानगीने मदत करु, असे पवार यांनी बीड येथे सांगितले. फळबागा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या गंभीर परिस्थितीची संपूर्ण कल्पना स्वत: दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांनी संबंधित विभागांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. गारपिटग्रस्तांच्या तातडीच्या मदतीसाठी केंद्र सरकारने एका समितीची नियुक्ती केली आहे. या आठवड्यात ही समिती संपूर्ण गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. त्यानंतर ही समिती मी अध्यक्षपदी असलेल्या उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सादर करणार आहे, असे पवार यांनी सांगितले.आचारसंहिता लागू असल्याने राजकीय नेत्यांना मदत वाटता येणार नाही, मात्र निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार शासकीय अधिकारी मदत वाटपाचे काम करतील. कसेही करुन शेतक-यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले. बारामतीला माझ्या स्वत:च्या बागांमधील केळी आणि चिकूचे संपूर्ण नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.









