
औरंगाबाद – ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून, हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते मी पाहतो,’ अशा शब्दांत पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय केनेकर यांना धमकावले. या प्रकारामुळे केनेकर यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पोलिस संरक्षण मागितले आहे.
सिटी चौक पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनात केनेकर यांनी म्हटले आहे की, ‘२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या दालनात जात असताना दोन सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. आयुक्तांच्या दालनात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी आणि आयुक्त आहेत. कोणालाही आत सोडू नका, असे आयुक्तांचे आदेश आहेत, असे रक्षकांनी सांगितल्यामुळे परत फिरून मी दुसऱ्यांदा आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो. रक्षकांनी मला पुन्हा परत पाठवले.’
‘तिसऱ्यांदा गेलो तेव्हा पालिकेचे कर्मचारी डीएच्या मागणीसाठी तेथे आले होते. मी आपणाशी बोलू शकतो का, असे आयुक्तांना विचारले. लवकर बोला मला वेळ नाही, असे ते म्हणाले. डीएची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वृत्तपत्रांचे छायाचित्रकारही आयुक्तांच्या दालनात आले. त्यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ केली. ‘या सर्वांना बाहेर काढा,’ असे त्यांनी सुरक्षारक्षकांना फर्मावले. अशा भाषेत बोलू नका, अशी विनंती मी केली. तेव्हा ‘तुम्ही या सर्वांचे वकिलपत्र घेऊन आलात का,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘माझ्या कर्मचाऱ्यांशी कसे बोलायचे हे तुम्ही मला शिकवू नका,’ असे म्हणत ‘अरे यालापण बाहेर काढा,’ असे आदेश आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना दिले. तुम्ही मला अशा भाषेत बोलू शकत नाहीत, असे मी आयुक्तांना म्हणालो. तेव्हा त्यांनी आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते पाहतो,’ अशी धमकी दिली. धमकी देणाऱ्या अशा या विक्षिप्त माणसाकडून मला भीती वाटत आहे. माझ्या जीवाला धोका असल्यामुळे आयुक्तांच्या विरोधातली माझी तक्रार नोंदवून घ्यावी व मला पोलिस संरक्षण द्यावे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.
सिटी चौक पोलिसांनी संजय केनेकर यांच्या तक्रार अर्जाची नोंद घेतली आहे. या संदर्भात आयुक्त महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.









