पॅरिस- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलला सर्वोत्कृष्ट ब्रँडचा किताब मिळाला आहे. भांडवलाच्या तुलनेत गुगलने अॅपलला मागे टाकले.
मिलवर्ड ब्राउन या आघाडीची संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार गुगलची ब्रँड व्हॅल्यू १५८.८४ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत ४० टक्क्यांची वाढ झाली असून इतर ब्रँडच्या तुलनेत गुगल महागडा ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षभरात गुगलने अनेक नावीन्यपूर्ण गॅजेट्स तंत्रज्ञान जगतात आणली. यामध्ये गुगल ग्लास तसेच गुप्तचर सेवांसाठीची मोठी गुंतवणूक आणि नव्या भागीदारी करण्यात कंपनीने भर दिला असल्याचे मिलवर्ड ब्राउनचे प्रमुख बेनॉइट ट्रान्झर यांनी सांगितले.
गुगल ग्लास या इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या चष्म्यासाठी कंपनीने लुक्सोटिका या रेबॅन नंतरच्या आघाडीच्या कंपनीशी करार केला. तर इतर उत्पादनांसाठीही गुगलने आघाडीच्या कंपन्यांशी करार केला. यातून ग्राहकांमध्ये गुगलबाबत आश्वासक वातावरण निर्माण झाले असल्याचे ट्रान्झर यांनी सांगितले. दरम्यान, सर्वात महागडा ब्रँड म्हणून गेल्या तीन वर्षापासून आघाडीवर असलेल्या अॅपलच्या ब्रँड व्हॅल्यूत मात्र २० टक्क्यांची घट झाली आहे. अॅपलचे बाजारमूल्य १४७.८८ अब्ज डॉलपर्यंत खाली आले आहे. जगातील १०० आघाडीच्या ब्रँडमध्ये पहिल्या १० कंपन्या अमेरिकेच्या आहेत. गुगल, अॅपलनंतर आयबीएम, मायक्रोसॉफ्ट यांची सर्वोत्तम ब्रँड म्हणून निवड झाली. मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली असून कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत २९ टक्क्यांची वाढ झाली. फास्ट फूडमधील आघाडीचा ब्रँड असलेल्या मॅकडोनाल्डची ब्रँड व्हॅल्यू ८५.७१ अब्ज डॉलर असून त्याखालोखाल कोका कोला ब्रँड आहे. कोका कोलाची ब्रँड व्हॅल्यू ८०.६८ अब्ज डॉलर असल्याचे मिलवर्ड ब्राउनने आपल्या अहवालात म्हटले आहे.









