अहमदाबाद – सोळ वर्षांची गीता बरिया सकाळी सात वाजता शाळेसाठी तयार असते. पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस नेसून लांब केसांना वेणी बांधून मैत्रिणींची वाट पाहत असते. सगळ्या मैत्रिणी आल्यानंतर तिला नदीतून पोहून शाळेत जायचं असतं. हा तिचा दररोजचा दिनक्रम आहे.
मध्य गुजरातच्या आदिवासी बहूल छोटा उदयपूर जिल्ह्यातील सजनपुरा या गावातले हे चित्र. नदी किनारी उभी राहून गीता आपल्या मैत्रिणींची वाट पाहतेय. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या गावांमधून इथं आलेले आहेत. नदीचं पाणी थंडगार आहे. परंतु सहाशे मीटरचं अंतर त्यांना कापायचं आहे. मात्र गीतासह इतर १०० विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाण्यासाठी हा एक शॉर्टकटचा मार्ग आहे. त्यानंतर आणखी पुढे त्यांना ५ किमी अंतर कापून शाळेत जायचं आहे.
या विद्यार्थ्यांसोबत २० लिटर पाणी मावण्याची क्षमता असलेलं एक पितळेचं पाण्याचं भांडं असतं. याला येथे ‘गोहरी’ म्हणतात. गोहरीत पुस्तकं टाकून विद्यार्थी नदीत उडी मारतात. मुलीही असंच करतात. मुलं एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुलांच्या पालकांची आळीपाळीने ड्यूटी लावलेली असते.
दहाव्या वर्गातच शिकणारा सिद्धार्थ आपली कहाणी सांगतो असतो, ‘शाळेचा गणवेश आणि पुस्तकं आम्ही भांड्यात टाकून नदी ओलांडतो. दुसऱ्या किनाऱ्यावर पोचल्यानंतर आम्ही भांड्यातून कपडे काढून नेसून शाळेत जातात. गीताचे अनुभव फार विदारक आहे, ‘नदीपल्याड किनाऱ्यावर गेल्यावर आम्हाला तर कपडे बदलायलाही जागा नसते. ओल्या कपड्यातच शाळेत जावं लागतं. त्यामुळे आम्ही अनेकदा आजारी पडतो. परीक्षा तोंडावर आहे. पुन्हा थंड पाण्यात पोहून शाळेत जायचं आहे. गीता सोबत इतर ३० विद्यार्थीनी दररोज पोहून शाळेत जातात.









