
वाशिम – कारंजा लाड येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा अपहार केल्याची तक्रार शेखर पुरुषोत्तम काण्णव यांनी रविवारला कारंजा शहर पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी विश्वस्तांसह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेखर काण्णव यांनी दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे, की कारंजा येथील राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी सन २०००-२००१ ते सन २०१०- २०११ या १० वर्षांच्या कालावधीत संगनमत करून संस्थानला देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांचा बनावट लेखा अहवाल तयार केला. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात खोटे व बनावट लेखा अहवाल दाखल करून अंदाजे ३६ कोटी ३७ लाख ७९ हजार ८३३ रुपयांची अफरातफर केली आहे. कारंजा शहर पोलिसांनी तक्रारीवरून नारायण गणपत खेडकर (८०), वसंत महादेव सस्तकर (७७), उमाकांत पुरुषोत्तम पांडे (७०), दिगांबर राजाराम बर्डे (८०), विनायक दिगांबर सोनटक्के (६५), श्रीपाद यशवंत पळसोकर, प्रकाश वसंत घुडे सर्व रा. कारंजा, सुभाष विनायक मुंगी (लेखापरीक्षक) रा. अकोला व संजय एस. खांडेकर (सनदी लेखापाल) रा. अमरावती यांच्याविरुद्ध अपराध नं. ७२/१५ भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४०८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कारंजा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश महाजन, शिपाई नीलेश जयसिंगवार व गणेश जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.









