
गुरू रविदासांचा जन्म अशा वेळेस झाला की, ज्यावेळेस शूद्रांवर अन्याय, अत्याचार होत होते. हिंदू समाजव्यवस्थेत जातिवाद, वर्णवाद, रूढिवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. वर्षानुवष्रे चालत ते स्वत: उभे राहिले. रविदासांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण देशाला जागृत केले.
गुरूरविदासांच्या कार्यांची स्मृती अनेक संतांनी केलेली आहे. ज्यात संत तुकाराम, गुरुनानक, गुरूकबीर, संत सेना, संत मीराबाई, संत एकनाथ, संत धन्ना, संत हरिदास, संत दादू, संत नाभादास इ. गुरूरविदासांनी सामाजिक विषमतेविरुद्ध त्या काळात कठीण संघर्ष केला. गुरू रविदासांनुसार ब्राह्मण, मौलवी, शीख, हिंदू, मुसलमान, चांडाळ, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इ. जेवढी माणसे आहेत ती सर्व सारखी आहेत. या सर्वांना निर्माता एकच आहे. सगळे हाड, मांस, चामड्यापासून तयार झालेले आहेत म्हणून एकमेकांना उच्च-नीच समजू नये, सगळे एकच आहेत.
हिंदू-मुसलमान मंदिर-मशिदीसाठी भांडत असतात. याविषयी गुरू रविदास म्हणतात. मंदिर-मशीद एकच आहे, राम-रहिम एकच आहे. राम मंदिरात नाही आणि अल्ला मशिदीमध्ये नाही म्हणून तुम्ही निर्थक भांडू नका. मंदिर आणि मशिदीमध्ये नतमस्तक होण्याची गरज नाही, कारण परमेश्वर सर्वव्यापी आहे.
ज्याला तुम्ही शोधता तो मथुरा, काशी, हरिद्वार इ. तीर्थस्थानात नाही; तो माझ्या मनात आहे. पोथी, पुराण आणि पुजारी यांच्यामागे लागू नका, असा मोलाचा सल्ला गुरूरविदासांनी दिला. संत मीराबाई गुरू रविदासांकडून दीक्षा घेऊन शिष्या झाली. मीराबाईने मोठय़ा सन्मानाने गुरू रविदासांच्या उल्लेख आपल्या पदांमध्ये केलेला आहे.
”मेरो मन लागो गुरु सो’ अब नरहुंगी अटकी गुरु मिलिया रैदास जी, दीन्ही ज्ञान की गुटकी।”
”रैदास सन्त मिले मोह सत्गुरु दीन्ही सुरत सहदा की।”
”मीरा के प्रभु तेही स्वामी श्री रैदास सत्गुरु जी।”
”मीरा ने गोविंदा नित्या जी गुरु मिल्या रैदास।”
हजारो वर्षांपासून बहुजन समाज गुलामी आणि लाचारीने जीवन जगत आहे. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब म्हणतात, ”गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी संषर्घ करतील.”
हाच विचार रविदासांनी त्यांच्या काळात ठेवला होता आणि समाजाला गुलामीविरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला होता. ज्या व्यवस्थेने बहुजनांसाठी संघर्ष करणार्या अनेक संतांचा छळ केला, अनेक महापुरुषांचा छळ केला, काहीचा खून केला. हजारो वर्षांपासून बहुजन समाज या देशात अपमानित होत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे बहुजन समाजाला त्याच्या गुलामीची, पराधीनतेची जाणीव नाही. आज बहुजन समाज ६000 जातींमध्ये विभागलेला आहे. अनेक धर्मांमध्ये विभागलेला आहे. बहुजन समाजाची धारणा आहे की, ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.” तेव्हा त्याला त्याच्या गुलामीविरुद्ध जागृत केल्याशिवाय येणारा काळ, अन्यायमुक्त, शोषणमुक्त होणार नाही. येणारा काळ जर अन्यायमुक्त, शोषणमुक्त करायचा असेल तर समाजातील सुज्ञ लोकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रत्येक समाज जागृत करावा लागेल. दीन दु:खी केहीत जउ, वारै अपने प्रान। ‘रविदास’ उह नर सुर कौं, सांचा छत्री जान।। दीन, दु:खी लोकांचे दु:ख नष्ट करण्यासाठी जे झटतात, चंदनासारखे झिजतात, आपल्या प्राणाचे बलिदान देतात तेच खरे शूरवीर आहेत, क्षत्रिय आहेत. आपण सर्व गुरू रविदासांना आपल्या समाजाचे आदर्श महापुरुष मानतो. मार्गदर्शक मानतो. आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण त्यांना कशाप्रकारे मानतो. आणि खरंच मानीत आहोत का? त्यांनी आमच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि हक्क, समानतेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपण विचार करायला पाहिजे की, त्यांनी दाखविलेला कल्याणकारी मार्ग आणि महत्त्वपूर्ण सल्ल्याला आपण जीवनात स्वीकारले का? त्यांचा फोटो आदरपूर्वक ठेवल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? किंवा त्यांच्या विचारांना जीवनात समावेश करून त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? आमच्या प्रगतीसाठी त्यांनी जो मार्ग दाखविला तो कुणाची भक्ती केल्याने पूर्ण होईल का? की कर्म केल्याने पूर्ण होईल?
”सांडू दे रक्त वाहू दे पाट
क्रांती! कधीचीच बघते तुझी वाट।”
”बता रे पंडित ज्ञानी कौन चाम से न्यार।
चाम का ब्रह्म, चाम का विष्णु,
चाम का सकल पसारा।
चाम काय योगी, चाम का भोगी,
चाम का गुरु तुम्हारा।
कह रैदास सुनो रे पंडित ज्ञानी, चाम का गुरु नाहिं हमारा।
संत शिरोमणी गुरू रविदासजी.
लेखिका – शुभांगी विजय मालखेडे
मो. ९९७0३९६३७0









