
नवी दिल्ली, दि. १०( प्रतिनिधी) – गृहिणींना स्वयंपाकासाठी लागणारा घरगुती गॅस सिलेंडर आता अवघ्या १५५ रुपयात देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
पाच किलो वजनाचा हा मिनी गॅस सिलेंडर घरगुती गॅस ग्राहकांना अवघ्या १५५ रुपयात देण्यात येईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्य सभेत सांगितले. सध्या घरगुती गॅस ग्राहकांना वर्षाला १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर मिळतात. एका सिलेंडरची दिल्लीतील किंमत ४१७ रुपये आहे. आता पाच किलो वजनाचा हा मिनी घरगुती गॅस सिलेंडर असून तो १५५ रुपयांना मिळणार आहे. तसेच वर्षाला ३४ मिनी घरगुती गॅस सिलेंडर अनुदानित देण्यात येणार आहेत. यामुळे गरीबांना गॅस सिलेंडर परवडतील, असे प्रधान म्हणाले.त्यानंतरही आवश्यकता भासल्यास हे विनाअनुदानित मिनी घरगुती गॅस सिलेंडर बाजारात ३५१ रुपयांना मिळणार आहे. तर १४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर ७५२ रुपयांना मिळतात.









