
गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ टाटा नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ड्रायवरने चलाखी दाखवत वेळ असतानाच गाडी रोडच्या बाजुला उभी केली. त्यामुळे या घटनेत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. मात्र, अचानक नॅनो कारच्या इंजिनकडील भागाने पेट घेतल्याचे ड्रायव्हरकडून सांगण्यात आले. त्यामुळे नॅनो कारबद्दल पुन्हा एकदा भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे.
आमगाव रोडवरील अदासी फाट्याजवळ पांढऱ्या रंगाची नॅनो कार प्रवास करत होती. मात्र, नॅनोच्या इंजिनकडील भागाने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली आहे. गाडीने पेट घेतल्याने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला लावत अलगदपणे स्वत:ला गाडीतून बाहेर काढले. दरम्यान नॅनो कारने अचानक पेट घेण्याच्या घटनांमुळे नॅनो कारबद्दलचे ग्राहकांचे आकर्षण कमी झाले होते. गरिबांचा सफारी असलेल्या नॅनोच्या सुरक्षिततेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणाची दखल घेत टाटा कंपनीने नॅनो कारमध्ये विशिष्ट सुधारणा केली. तसेच लाखो ग्राहकांना विशिष्ट कालावधीत घेण्यात आलेल्या नॅनो कारच्या इंजिनमध्ये बदलही करुन दिला. तर काहींना पूर्णपणे नवीन गाड्या देण्यात आल्या. त्यामुळे नॅनोबद्दलची विश्वासर्हता पुन्हा एकदा सामान्य लोकांच्या मनात रुजत आहे. पण, गोंदियात नॅनो कारने पुन्हा पेट घेतल्याने नॅनो कार वापरण्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.









