
यवतमाळ , दि. २९ : जिल्ह्यातील मे व आगस्ट या महिन्यांमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तथा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या धर्तीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी म्हणाले.
जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या 663 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर 81 ठिकाणी रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॅा.शरद कुलकर्णी, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता श्री.काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे आदी उपस्थित होते. सदर ग्रामपंचायत निवडणूका 2011 च्या जनगणनेनूसार घेण्यात येत असून यासाठी इलेक्टॅानिक मतदान यंत्र वापरण्यात येत आहे. निवडणूकीनिमित्त लावण्यात आलेली आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीच्या संपुर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणूकीसाठी प्रभागाच्या क्षेत्रात लागू राहतील, असे बैठकीत सांगण्यात आले.









