रत्नागिरी – देशाचा समतोल विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून, सरकारमार्फत याच उद्देशाने विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
स्वा. सावरकर नाटय़गृह येथे अन्न सुरक्षा योजना प्रारंभ आणि राजीव गांधी जीवनदाय योजनेंतर्गत हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे, रमेश कीर आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले की, सरकारी कृषीक्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशातून तीन लाख कोटींचा कृषी माल निर्यात करण्यात येत आहे. भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातक देश आहे. बासमती एवढीच कोकणातील हापूसला जगातून मागणी आहे. शेतक-यांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले असून, त्याचे चांगले परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कृषि कर्जमाफी योजना राबवली आहे. कर्जवाटपात लक्षणीय वाढ करून एकूण आठ लाख कोटीचे कृषि कर्ज वाटप करण्यात येत आहे. तांदूळाच्या हमीभावातही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व प्रगतीचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे ते म्हणाले. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभही ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य जनतेला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेशन दुकानदार आणि ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला करून दिल्यास प्रगत भारताचे चित्र साकार होईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले की, कोकणातील जिल्ह्यांच्या शेजारील जिल्ह्यांप्रमाणे विकास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथल्या निसर्गसंपदेचा लाभ विकासाच्या दृष्टीने करून घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विकास आणि स्थानिकांच्या गरजांचा विचार करताना पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने असलेल्या क्षमतेचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध क्षेत्रांतील विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठीदेखील विविध योजना राबविण्यात येत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यातील ११ लाख जनतेला अन्न सुरक्षा तर १४ लाख जनतेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले.









