घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन

01
यवतमाळ, दि. १४ – नगर परिषद क्षेत्रांतर्गत शासनाच्या विविध घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करून बांधकामास सुरुवात करावी यासाठी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.
नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नागा) या संघटनेचे प्रमुख आनंद गायकवाड यांनी विधान भवन मुंबई येथे समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन देऊन समस्त घरकुल योजनाच्या विलंबाची माहिती दिली. अशोकनगर, डोर्लीपुरा, पाटीपुरा, अंबिकानगर या भागात समाजकल्याण विभागाची रमाई आवास योजना २०११-१२ मध्ये लागू झाली मात्र ३१३ लाभार्थ्यांपैकी केवळ ५९ घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे तर २५४ घरकुलांची प्रकरणे अजुनही थंडबस्त्यात आहे. यवतमाळ नगर परिषदेकडून लाभार्थ्यांच्या जागेचे अजुनही मोजमाप करणेच सुरू आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी रंजनकुमार महिलवार यांना निवेदन देऊन उपोषणाची सूचना दिली असता न. प. ने ताबडतोब कार्यवाही करण्याची लेखी हमी दिली परंतु न. प. अभियंत्यांकडे पूर्ण न. प. ची कामे असल्याने घरकुल योजनेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याचीही कल्पना मंत्र्यांना देण्यात आली. रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी ठरवितांना अजुनही चालढकल सुरू आहे. अशोकनगर येथील योजना आराखड्यातील रस्ता वगळण्याची कारवाई तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे. वस्तुत: आवास योजनेला केवळ नगररचना संचालकाच्या मंजुरीचीच गरज असताना प्रकरण उगीचच वाढविण्यात येत असल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत संपूर्ण लाभार्थी पात्र ठरवून घरकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 2 =