चांगली पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने विधी साक्षर होणे आवश्यक – न्या.सविता बारणे

unnamed
यवतमाळ (प्रतिनिधी) –  आजच्या काळात केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होणेच महत्वाचे नाही तर प्रत्येकाने कायद्याच्याबाबतीत साक्षर होणेही तितकेच महत्वाचे आहे. पुढील पिढी सक्षम निर्माण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी व्यक्त केले.
जागतिक विधी साक्षरता दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विविध संघटना, शाळांच्या सहकार्याने विधी साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रॅलीचा शुभारंभ करतांना त्या बोलत होत्या. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीस सचिन आगरकर, वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.
कायद्याने प्रत्येक घटकाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे आपणासही आपले कर्तव्य, अधिकार याची जाणीव असली पाहीजे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि दुसऱ्याचा आपल्यालाही होऊ नये, असे प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी कायदे असल्याचा उल्लेख पुढे बोलतांना श्रीमती बारणे यांनी केला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांचेही भाषण झाले. विधी साक्षरता रॅलीमागची भूमिका प्राधिकरणाचे सचिव न्या.आगरकर यांनी विषद केली. त्यानंतर श्रीमती बारणे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सदर रॅली पोष्ट आँफीस चौक, हनुमान आखाडा चौक, इंदीरा मार्केट, पोलिस स्टेशन, येरावार चौक, एलआयसी चौक अशी फिरत पुन्हा जिल्हा न्यायालयात विसर्जीत झाली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी विधी साक्षरतेबाबत जनजागृती करणारे फलक घेऊन विधी साक्षरतेचा संदेश दिला.
या रॅलीत जयंत देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के यांच्यासह सर्व न्यायीक अधिकारी, वकील मंडळी, कर्मचारी तसेच शिवाजी विद्यालय, सावित्रिबाई समाजकार्य महाविद्यालय, नारायणराव माकडे शाळा, महात्मा फुले नगर परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × eight =