
मुंबई- मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने चारही आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. तर छायाचित्र पत्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी २४ मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात दोन तरुणींवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गुरुवारी सत्र न्यायालयाने विजय जाधव, मोहम्मद अन्सारी, कासिम शेख, सिराज खान आणि अश्फाक खान या पाच आरोपींना दोषी ठरवले होते. या आरोपींच्या शिक्षेवर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. सर्व आरोपी हे घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांना कमी शिक्षा करावी असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.तर आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सरकारी वकिल उज्वल निकम यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधात सध्या बालन्यायालयात खटला सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी अवघ्या सात महिन्यांत हा खटला निकाली काढला. या खटल्याचे सर्व कामकाज ‘इन-कॅमेरा’ चालवण्यात आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महालक्ष्मीच्या शक्ती मिल परिसरात छायाचित्र पत्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. याच आरोपींनी जुलैमध्ये टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार केला होता. दोन्ही बलात्कार प्रकरणाचे खटले एकत्रित सुरू करण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन आरोपी सारखेच आहेत. महिला छायाचित्रकारच्या खटल्यात ४४, तर टेलिफोन ऑपरेटरच्या खटल्यात ३१ साक्षीदार तपासण्यात आले. दोन सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरविले. त्यापैकी दोन्ही बलात्कारप्रकरणी विजय जाधव, मोहम्मद अन्सारी आणि कासिम शेख यांना दोषी ठरविले आहे. तर अश्फाक शेख याला टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणी, तर सिराज खान याला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी, अशा दोन वेगवेगळया गुन्हयांमध्ये दोषी ठरवले.या निकालाची प्रत शुक्रवारी पाहिल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे बचाव पक्षाचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी सांगितले.









