दिग्रस (यवतमाळ), दि. २४ – तालुक्यातील इसापूर येथे एका चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दिव्या शाम गायकवाड (६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. दिव्याचा खून वडीलानेच केल्याची तक्रार यशोदा शाम गायकवाड या महिलेने दिग्रस पोलीस ठाण्यात दिली.
सोमवारी दि. २३ फेबु्रवारी रोजी यशोदा व शाम या दाम्पत्यात कौटुंबिक कलह निर्माण झाला होता. यशोदा ही भावाकडे पुसद येथे निघून गेली. रात्री पतीने फोन करून उद्या सकाळपर्यंत मुलगी दिसणार नाही, असा फोन करून धमकाविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आज सकाळी १०.४० वाजता दरम्यान दिव्याचा मृतदेह दिग्रस-पुसदरोडवर असलेल्या संजय नालमवार यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर दिव्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यशोदाने दिग्रस पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून चिमुकलीला जिव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.











