उमरखेड , दि. १० – पतीच्या त्रासाला कटांळून चिमूकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उमरखेड येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ज्योती शिंदे (३२), वैष्णवी शिंदे (४) अशी मृतक मायलेकीची नावे असून, पोलिसांनी याप्रकरणी पती खंडू शिंदे यास अटक केली आहे.
येथील खंडू शिंदे सोबत ज्योतीचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच खंडूने आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली होती. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारा खंडू ज्योतीला किरकोळ कारणावरून सुद्घा मारहाण करीत होता. दोन मुली व एक मुलगा असल्यामुळे ज्योती पतीचा मार सहन करीत जगत होती. काल खंडूने वाद घालून ज्योतीला मारहाण केली होती. सततच्या त्रासाला वैतागलेली ज्योती आपल्या चार वर्षीय वैष्णवीला घेऊन घरून निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ज्योती घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोधाशोध सुरू केला. मात्र ज्योतीचा पत्ताच न लागला नाही. ज्योती वैष्णवीला घेवून निघून गेल्याबाबतची माहिती तिच्या चुलत बहिणीने ज्योतीच्या आईला फोनवर दिली. दरम्यान आज शनिवारी सकाळी उमरखेड – ढाणकी मार्गावरील लेंडीपुलानजिक असलेल्या एमआयडीसी परीसरातील विहिरीत लहान मुलीचा मृतदेह काही नागरीकांना तरंगताना दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता, विहिरीत महिलेचा देखील मृतदेह असल्याचे समोर आले. ज्योतीचा व वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच ज्योतीची आई रुख्मा पानपट्टे व नातेवाईक आले. त्यांनी खंडूच्या त्रासाला कटांळूनच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास एपीआय सदाशीव भडीकर करीत आहे.










