चैत्यभूमीवर लाखोंची रीघ : बाबासाहेबांना अभिवादन

images
मुंबई  दि. ६ – डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा, काखेत सामानाची बॅग अडकवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने लाखोंच्या संख्येने निळ्या लाटा दोन दिवस अगोदरपासूनच चैत्यभूमीच्या दिशेने धडकल्या आहेत.
‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दादर परिसर दणाणून जात आहे.चैत्यभूमीच्या दिशेने येणारे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणा-या स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत.
राज्याच्या बाहेरून येणा-यांची तीन दिवसांपासूनच गर्दी सुरू आहे. कुटुंबांसह चैत्यभूमी-शिवाजी पार्कवर मिळेल त्या जागेत मुक्काम करणा-या बाबांच्या अनुयायांवर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. अनेक सामाजिक संस्थांकडून मोफत भोजनदान सुरू आहे.
नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणा-या अभिवादन सभांबाबत चर्चा करताना त्यांच्या स्वार्थी राजकारणाबाबत अनेकांकडून खेद व्यक्त होताना दिसत होता. महापालिका व संस्था -संघटनांकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते होते. बाबासाहेबांना अभिवादन क रण्यासाठी लोटणारा जनसमुदाय दरवर्षी वाढतो आहे.
चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या कॅसेटस आणि ध्वनीफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्यांचे स्टॉल, महामानवाच्या प्रतिमा आणि पुतळे विकत घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी उसळली आहे. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले माझे भीमराव’ या गीताने अनेकांचा उर भरुन येत होता.
लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर बाबांचा क्रांतीचा मळा फुलला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी वर्षानुवर्षे अनुयायी येत आहेत. छोटय़ा लेकरांसह ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत सा-यांनीच अभिवादनासाठी रांगा लावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 1