
नवी दिल्ली – नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले. देशातील चार राज्यातील सात लोकसभा मतदारसंघात शनिवारी मतदान पार पडले.
गोव्यातील दोन जागांसाठी ७५ टक्के, आसाममधील तीन जागांसाठी ७५ टक्के, त्रिपुरामधील एका जागेसाठी ८१.८ टक्के, सिक्कीममधील लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या ३२ जागांसाठी ७६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पहिल्या तीन टप्प्यांप्रमाणे चौथ्या टप्प्यातही मतदारांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. सकाळी सातवाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून सर्वच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. गोव्यात लोकसभेच्या दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत. चौथ्या टप्प्यात सात जागांवर एकूण ७४ उमेदवार रिंगणात आहेत.









