
नवी दिल्ली- जगभरात झालेल्या बॉम्बस्फोटांची आकडेवारी पाहिली असता भारत हा जगात तिस-या क्रमांकाचा सर्वात धोकादायक देश ठरला आहे. राष्ट्रीय बॉम्ब डेटा केंद्राच्या पाहणीत इराक पहिला तर पाकिस्तान दुस-या क्रमांकावर आहे.या अहवालात म्हटल्याप्रमाणे, जगभराचा विचार केल्यास जगातील ७५ टक्के बॉम्बस्फोट हे इराक, पाकिस्तान आणि भारतात झाले आहेत.
भारतात २०१३ मध्ये अफगाणिस्तानच्या दुप्पट म्हणजे २१२ बॉम्बस्फोट झाले. यात १३० जणांचा मृत्यू आणि ४६६ जण जखमी झाले. तर अधूनमधून चर्चेत असणा-या अफगाणिस्तानात मात्र वर्षभरात १०८ बॉम्बस्फोट झाले. तर अंतर्गत धूसफूस असणा-या बांगलादेशात ७५ आणि सिरीयात ३६ बॉम्बस्फोट झाले. तर २०१२ मध्ये भारतात २४१ बॉम्बस्फोट झाले होते. यात ११३ जणांचा मृत्यू आणि ४१९ जण जखमी झाले होते. मागिल २००४ पासून २०१३ पर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता भारतात दरवर्षी सरासरी २९८ वेळा बॉम्बस्फोट झाले. यात एक हजार ३३७ निरपरांधाना नाहक बळी गेला. मागच्या पाच वर्षाचा अफगाणिस्तानमधील बॉम्बस्फोटांचा अहवाल पाहता यातही भारताच सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे दिसून येते. अफगाणिस्तानात मागच्या पाच वर्षात सरासरी २०९ बॉम्बस्फोट झाले.
भारतात आसाम आणि मणिपूरसह ईशान्य भारत तसेच बिहार, छत्तीसगढ आणि झारखंड येथे सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. मागच्या वर्षभरात सुमारे ८० टक्के बॉम्बस्फोट या परिसरात झाले. तर २०१२ मध्ये सुमारे ५० टक्के बॉम्बस्फोट जम्मू- काश्मीरमध्ये झाले होते.जम्मू- काश्मीर, झारखंड, मेघालय, पश्चिम बंगाल, नागालँड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तर मणिपूर, बिहार, छत्तीसगढ, आसाम, तामिळनाडू, ओदिशासह अन्य १५ राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण घटल्याचे या अहवालात म्हटले आहे.









