जनमत चाचण्या चुकीच्या ठरणार – राहुल गांधी

Rahul-Gandhi-widget_gk_nsp-13
अमेठी- जनमत चाचण्यांमधून काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे भाकीत केले जात असले तरी अशा जनमत चाचण्यांना काँग्रेसने नेहमीच चुकीचे ठरवले आहे आणि या वेळीही या चाचण्यांना चुकीचे ठरवत काँग्रेसलाच विजय मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
२००४ आणि २००९ मध्ये जनमत चाचण्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसच्या विरोधात भाकीत केले होते आणि या दोनही निवडणुकीत काँग्रेसनेच सत्ता मिळवून या चाचण्या चुकीच्या ठरवल्या होत्या. या निवडणुकीतही तसेच होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांचे अमेठीच्या नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी होत्या. या भावंडांचा ताफा अमेठीच्या रस्त्यावरून जात असताना त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पाहून दोघांनी हात उंचावून त्यांचे स्वागत स्वीकारले. राहुल आणि प्रियांका यांच्यावर या वेळी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. प्रियांका गांधींबरोबरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका या मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून स्मृती इराणी व ‘आप’चे कुमार विश्वास निवडणूक लढवत आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १४ आणि १५ एप्रिल रोजी राज्यात येणार आहेत. या दरम्यान ते भाऊसाहेब वाकचौरे, विश्वजीत कदम, राजीव सातव यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. १४ एप्रिलला शिर्डी व लातूर येथे तसेच १५ एप्रिल रोजी ते पुणे आणि हिंगोलीला प्रचारसभा घेतील. राज्य प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two + = 6