
पुणे : कोंढवा पोलिसांचे बीट मार्शल हद्दीमध्ये गस्त घालीत होते… साधारणपणे पंधरा वर्षांची एक मुलगी रस्त्यावर रडत बसलेली त्यांना दिसली… मार्शलवरील दोन्ही पोलिसांनी तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली… तिला सोबत घेऊन हे दोघेही पोलीस चौकीत गेले. महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली… त्यानंतर तिने जे काही सांगितले, त्यामुळे पोलीस हादरून गेले…. जन्मदात्या पित्यानेच आपल्यावर बलात्कार केल्याने ही मुलगी ओक्साबोक्शी रडून सांगत होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधम पित्याने त्याच्या आणखी दोन मुलींबाबतही असाच प्रकार केला आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलींनी आईला सांगूनही तिने गप्प राहण्याचा सल्ला दिला. नवऱ्यावर कोणीतरी करणी केल्याने तो असे वागत असल्याचे तिला वाटत होते.
पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. मूळचं उत्तर प्रदेशातील हे कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात रहायला आलं. कोंढव्यामध्ये चार मुली आणि एका मुलासह हे दाम्पत्य रहात आहे. बाप रिक्षा चालवतो. तर त्याची पत्नी छोटीमोठी कामे करते. पत्नी कामावर गेली, की तो दुपारी जेवणाच्या निमित्ताने घरी यायचा. घरामध्ये एकट्या असलेल्या मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर बलात्कार करायचा. त्याच्या सर्वांत मोठ्या २२ वर्षीय मुलीने शुक्रवारी पोलिसांना जबाब दिला. त्यामध्ये आपल्यावरही वडिलांनी चार वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिचे लग्न लावून दिले.
उत्तर प्रदेशला सासरी नांदत असताना पतीने तिला परत पाठवून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहते. परंतु ती वडिलांशी बोलत नाही. वडील पुन्हा बलात्कार करतील, या भीतीने ती कायम आईसोबतच राहते. आईसोबतच कामावर जाते. तर धाकट्या १८ वर्षांच्या मुलीवरही त्याने अशाच पद्धतीने बलात्कार केला होता. परंतु तिने जेव्हा आईला हा
प्रकार सांगितला तेव्हा आईने सर्वांना शांत राहण्यास सांगितल्याचे जबाबात म्हटले आहे. वडिलांवर कुणीतरी करणी केली आहे, त्यामुळे ते असे वागतात, असे ती मुलींना सांगत होती.गेल्या आठवड्यात त्याची नजर तिसऱ्या मुलीकडे वळली. दुपारी जेवायला आला असता त्याने तिच्यावरही बलात्कार केला. घरासमोर रडत बसलेल्या या मुलीला पोलीस चौकीत आणल्यावर सर्व बाबींचा खुलासा झाला.पोलिसांनी तिच्या आईलाही बोलावून घेतले. परंतु तिने फिर्याद देण्यास नकार दिला. तसेच मुलीलाही फिर्याद देऊ नको असे सांगितले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीच स्वत:हून फिर्याद दाखल केली आणि त्याला अटक केली.









