
वाशीम – अहमदनगर जिल्हयातील जवखेेडे खालसा येथे २२ ऑक्टोंबर रोजी जाधव कुटुंबातील तीन व्यक्तींची अमानुष हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळीमा ङ्गासणारी आहे. या घटनेच्या तपास कामात पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही. या अमानवीय घटनेला १९ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्राचे पोलीस अंधारातच आहेत. पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणार्या या राज्यासाठी ही घटना अतिशय लांछनास्पद आहे. या संदर्भात पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉगमार्चचे प्रणेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर दलित अत्याचार धिक्कार विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपूर्ण राज्यातून तमाम भिमसैनिकांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांनी केले आहे.









