
इस्लामाबाद- जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पोलीओ लसीकरण मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील पोलीओ मोहीमेतील चार सदस्यांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलीओ मोहीम सुरु होती. मोहीमेच्या अखेरच्या दिवशी क्वेट्टा येथे लसीकरण सुरु असताना काही दहशतवादी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले.
या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील पोलीओ मोहीम बंद केली आहे. कार्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जोपर्यंत पाकिस्तान सरकारकडून कर्मचा-यांना सुरक्षा दिली जात नाही. तोपर्यंत ही मोहीम थांबवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानमध्ये पोलीओ मोहीमेसाठी काम करणा-या ६० जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.









