
पुसद (यवतमाळ), दि. २८ – जादूटोणा केल्याच्या संशयातून इसमाला लोखंडी खांबाला बांधून आठ जणांनी बेदम मारहाण केली. यातच इसमाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील वेणी (खु.) येथे २७ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. माधव लक्ष्मण खंदारे (५५) असे मृताचे नाव आहे.
माधव खंदारे हा इसम रात्री दरम्यान काम आटोपून घरी आल्यानंतर गावातील आठ जणांनी त्यास घरी गाठले. जादूटोना केल्याचा संशय व्यक्त करीत लोखंडी खांबाला बांधून लाथा बुक्यांनी पोट, छातीवर बेदम मारहाण केली. हा प्रकार बघून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून माधवला आठही जणांच्या तावडीतून सोडविले. गंभीर जखमी माधव खंदारे त्याच अवस्थेत घरी गेला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पार्वती खंदारे हिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी इस्माईल खान मनवर खान, नाजीर खान मनवर खान, उस्मान खान नामदार खान, सलमान खान इस्माईल खान, जमीर यांच्याविरुद्ध १४३, १४७, १४९, ३०३ कलम ३ (२) महाराष्टÑ नरबळी इतर अमानुष व इतर अनिष्ट प्रथा व जादुटोना प्रतिबंध कायदा २०१३, कलम ३ (२)(५) अनुसूचित जाती अन्वये गुन्हा नोंद केला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार बुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे. जाटूटोण्याच्या संशयातून एकाला संपविल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.









