पुणे – अचूक टायमिंग आणि सहज संवाद साधण्याच्या कौशल्यामुळं रसिकांना पोट धरून हसायला लावणारे आणि हसवता-हसवता नकळत भावूक करून टाकणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा (७७) यांचे आज सकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येरवडा येथील स्मशानभूमीत दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. २३ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेल्या देवेन यांचे बालपण पुण्यात गेले. पुण्यातील नवरोजी वाडीया कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्समधून राज्यशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी रुपा गांगुली यांच्याशी देवेन त्यांचा विवाह झाला. ‘धर्मपुत्र’ चित्रपटातून १९६१ साली त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी बरोबरच मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. बासु चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांसारख्या दिग्गजांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील देवेन यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते.









