टीम इंडियाचा विजयी

Harare
हरारे, दि. १९ – ग्रीम क्रेमरच्या फिरकीने भारताला गुंडाळले असून दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाव्बेने भारतावर १० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. रॉबिन उथप्पाच्या ४२ धावांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
हरारे येथे रंगलेल्या दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभाने ६७ धावांची खेळी करत संघाला १४५ धावांचा पल्ला गाठून दिला. झिम्बाब्वेने २० षटकांत ७ गडी गमावत १४५ धावा केल्या. भारतातर्फे मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. झिम्बाब्वेच्या १४६ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ३ धावांवर धावबाद झाला. रॉबिन उथप्पा व मुरली विजयने फटकेबाजी करत भारतीय संघाला अर्धशतकापर्यंत पोहोचवले. मात्र मुरली विजय १३ धावांवर बाद झाल्यावर भारताची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. रॉबिन उथप्पाने एकाकी झुंज देत ४२ धावा केल्या. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात तोदेखील बाद झाला. केदार जाधव ५ तर मनिष पांडे भोपळा न फोडताच माघारी परतला. यानंतर स्टुअर्ट बिन्नीने २४ धावा तर संजू सॅमसनने १९ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र एकही फलंदाज भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताला २० षटकांत ९ गडी गमावत १३५ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेच्या ग्रीम क्रेमरने ४ षटकांत १८ धावा देत तीन विकेट घेतल्या. क्रेमरच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना लगाम लावला. या सामन्यात भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले. एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिल्यानंतर टी – २० मालिकेतही झिम्बाब्वेवर विजय मिळवण्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा निर्धार होता. मात्र दोन सामन्यांची टी -२० मालिका झिम्बाब्वेला १-१ अशा बरोबरीत सोडवण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − eight =