यवतमाळ – दुचाकीने गावाकडे जात असताना ट्रेलरने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.४५ वाजता नागपूर बायपास(कळंबचौक) येथे घडली. सचिन मधुकर बोरकर (२६), विष्णू गुलाब भोसेकर (३०) दोघेही रा. कळंब माथा असे मृतांचे नाव आहे.
सचिन व विष्णू यवतमाळात एक वाहनावर काम करीत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते कळंब येथे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच. २९/ वाय ७२१)निघाले. नागपूर बायपासवर दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. ही बाब ट्रेलर (क्रमांक एम.एच.३१/ वाय८४९१)चालकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रेलरने दोन्ही युवकांना जवळपास ५० मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. नागपूर बायपासवर कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलीस शिपायाच्या लक्षात ही घटना आली. त्याने शिट्टी वाजवून ट्रेलरचालकाला थांबविले असता समोरचे दृष्य बघून चालकालाही धक्का बसला. हा अपघात नेमका कसा झाला, त्यालाही कळले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोनही युवक कळंबकडे जात असताना दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. त्यातच युवकांचा चिरडल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळताच ठाणेदार दिलीप चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास वांदीले, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघात स्थळावर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. सदर ट्रेलर हा पांढरकवडा येथून जालन्याकडे जात होता. शंकर बोरकर याने या घटनेची तक्रार शहर पोलिसात दिली. त्यावरून ट्रेलरचालक विठ्ठल किसन राऊत रा. रुंदावन टाकळी ता. पांढरकवडा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावाकडे जाणाºया युवकांवर काळाने झडप घातली. याघटनेने कळंब शहरात शोककळा पसरली होती.









