
झरी – कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. चोरी, दरोडा, खून झाल्यास या घटनांचा छडा लावण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र ठाणेदाराचेच जोडे चोरीला गेल्यानंतर सर्वच कसे कामी लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव अडेगाववासीयांनी घेतला.
अडेगाव येथे पुतळा अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व नागरिक मंदीरातून बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ ठाणेदार असलम खान बाहेर आले. त्यांनी सर्वत्र जोड्यांचा शोध घेतला. मात्र कुठेही दिसून आले नाही. सामान्य नागरिकांचे नाही तर थेट ठाणेदाराचे जोडे चोरीला गेल्याची वार्ता कर्नोपकर्नी झाली. यामुळे ग्रामस्थ व पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. शोध घेऊनही जोडे सापडले नाही. ‘तो’ चोर कोण असावा याबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागली. साहेबांच्या जोड्याचे ‘रक्षण’ करता न आल्याने पोलीस कर्मचाºयांना घाम फुटला होता. मद्याच्या नशेत एक इसम या ठिकाणी घुटमळत होता. त्यानेच जोडे लांबविल्याची शंका काही नागरिकांनी व्यक्त केली. त्यावरून दोन युवकांनी त्या व्यक्तीचे घर गाठून इसमास गाठण्याचा प्रयत्न केला. इसम घरी मिळाला नाही. मात्र घरात ठाणेदारसाहेबांचे जोडे आढळून आल्याने युवकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जणू आपण एखाद्या मोठ्या घटनेचा छडा लावला या तोºयात युवक जोडे घेऊन ठाणेदार खान यांच्याकडे गेले. त्यांनी जोडे घातले आणि निघून गेले. या घटनेची गावात खमंग चर्चा आहे.









