
शेतकर्यांनो सर्वेक्षणात सहभागी व्हा – ना. संजय राठोड
यवतमाळ, दि. १३ – राज्यात सातत्याने शेतकर्यांच्या आत्महत्या होत असल्याने या आत्महत्यांमागील कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनातर्फे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांत शेतकर्यांच्या सर्वेक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या सर्वेक्षणात शेतकर्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यातून निघणार्या निष्कर्षांमधून शेतकर्यांसाठी ठोस उपाय योजले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महसूल मंत्रालयाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढून यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकर्यांचे शंभर टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले. या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी इत्यादी तालुकापातळीवरील अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाचे सर्वेक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देखरेख व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंडळस्तरावर मंडळ निरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवरील कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आदी अधिकार्यांचा समावेश असलेली समिती गठीत करून, या समितीने त्यांच्या अखत्यारित सर्व गावांच्या शेतकर्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणात शेतकर्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, शेतीचा प्रकार, कौटुंबिक माहिती, पत्नी व मुलांची माहिती, शेतीशिवाय उत्पन्नाचे इतर साधन असल्यास त्याची माहिती, गुरे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आदी जनावरांचा तपशील, राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी संस्था, नागरी पतसंस्था, खासगी बँकेच्या कर्जाची माहिती, नियमित परतफेड आहे किंवा नाही याचा तपशील, खासगी व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून घेतलेले कर्ज, उसनवारीची माहिती, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास त्याचा तपशील, घरातील धार्मिक कार्य, विवाह आदींसाठी असलेले आर्थिक नियोजन, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविला असल्यास त्याची माहिती, घरात कमावती व्यक्ती असल्यास त्याची माहिती व अनुषंगाने मिळणारी इतर सर्व माहिती गोळा करून ती या सर्वेक्षणात संकलित केली जाणार आहे.
हे सर्वेक्षण दीड महिन्यात पूर्ण करून आयुक्तांमार्फत अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना शेतकर्यांची वस्तुस्थिती समोर येईल याची अधिकार्यांनी दक्षात घेण्याची सूचना करून, शेतकर्यांनी आपल्या गावात हे सर्वेक्षण सुरू असताना परिपूर्ण माहिती सादर करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.









