
मुंबई : भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील ‘मेहरनजीर’ या बंगल्याची ३७२ कोटींना विक्री करण्यात आली आहे. बंगला खरेदी करणार्या मालकाने आपले नाव घोषित करू नये, अशी विनंती ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ला (एनसीपीए) केली आहे. त्यानुसार नव्या मालकाचे नाव जगजाहीर करण्यात येणार नाही.
डॉ. होमी भाभा यांचा हा बंगला केवळ मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या आधुनिक इतिहासाची पाऊलखुण मानली जाते. या बंगल्याचा लिलाव जूनमध्ये करण्याचा निर्णय या जागेचा ताबा असणार्या ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने (एनसीपीए) घेतला होता. या बंगल्याचा भूखंड १७ हजार १५0 चौरस फुटांचा आहे, तर १३ हजार ९५३ चौरस फूट बिल्टअप क्षेत्र आहे.लिलावाची प्राथमिक किंमत २५७ कोटींची ठेवण्यात आली होती. मात्र त्यापेक्षा ११५ कोटी जास्त बोली लावून बंगला खरेदी करण्यात आला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या बंगल्याची लिलावाच्या माध्यमातून विक्री न करता ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून घोषित केला जावा, अशी मागणी करत भाभा अणुसंशोधन केंद्रातील कर्मचारी संघटनांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत लिलाव प्रक्रियेवर स्थगिती आणण्यास नकार दर्शवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनीही केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.









