यवतमाळ – महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी उजेडात आली.
आशिष शेषराव मनवर (१३) रा. विट्टभट्टी चौक अंबीका नगर असे मृतकाचे नाव असून तो आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. तो आपल्या मित्रासोबत काल दुपारी १.३० वाजता महाशिवरात्री निमित्त पाचधरा येथे दर्शनासाठी गेला होता. दरम्यान ते पोहण्यासाठी डोर्ली क्र. दोन येथील तलावात उतरले. यावेळी आशिष हा पाण्यात बुडाला. सायंकाळ होऊनही तो बाहेर न आल्याने मित्राने शहरात धुम ठोकुन ही माहिती नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र रात्र होऊनही त्याचा शोध लागला नव्हता. अशातच आज शुक्रवारी सकाळी आशिषचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह वसंतराव नाईक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी मृतकचे वडील शेषराव मनवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.









