
मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता इंडियन सुपर लीगमध्ये फुटबॉल संघांचे मालक झाले आहे. सचिनने कोची संघ विकत घेतला असून गांगुलीने त्याच्या घरचा म्हणजे कोलकाता संघासाठी यशस्वी बोली लावली. सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत कोची संघाचे हक्क मिळवले. याउलट गांगुलीने स्पेनमधील आघाडीचा क्लब अॅटलेटिको माद्रिद, हर्षवर्धन नोटिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख या व्यावसायिकांसोबत संयुक्तपणे कोलकाता संघाचे मालकी हक्क मिळवले.
मुंबई संघाची मालकी मिळवण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यश आले. त्याने बिमल पारेखसोबत मुंबई संघ विकत घेतला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पुण्याचा संघ विकत घेण्यात यशस्वी झाला. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान ग्रुपसोबत सलमानने ही यशस्वी बोली लावली. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आय-लीग संघ शिलॉँग लॅजॉँगसोबत गुवाहाटी संघ खरेदी केला. दिल्ली संघ घेण्यात समीर मनचंदा यांचा डेन नेटवर्क यशस्वी ठरला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकी असलेला सन ग्रुप बंगळूरु संघ यशस्वीपणे खरेदी करू शकला. व्हिडियोकॉनचे वेणुगोपाळ धूत, दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास डेंपो यांनी एकत्रितपणे गोवा संघाचे मालकी हक्क मिळवले. स्टार इंडियाच्यावतीने आयएमजी-रिलायन्सने या लीगचे आयोजन केले आहे. अर्थातच त्याला अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) पाठिंबा आहे. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ही लीग होणार आहे.









