पणजी – सहकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर गोवा पोलिसांनी सोमवारी आरोपपत्र दाखल केले . यामध्ये तेजपाल यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपामध्ये तेजपाल दोषी आढळल्यास त्यांना सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
मुख्य न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. भारतीय दंड विधानानुसार कलम ३५४, ३५४ अ (लैंगिक शोषण) ३४१ आणि ३४२, ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एफ) आणि ३७६ (२) (के) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपपत्रात दाखल केलेले पुरावे तेजपाल यांना दोषी ठरविण्यात पुरेसे असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे आहे.गोव्यात थिंकफेस्ट या कार्यक्रमादरम्यान तरुण महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला ३० नोव्हेंबर २०१३ रोजी अटक केली होती. सध्या तेजपाल वास्को येथील साडा तुरुंगात आहेत.









