तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या

2014-12-03~news_ns
सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीत आलेल्या एका जोडप्याच्या पाच वर्षीय मुलीला प्रियकराने दारूच्या नशेत उकळत्या तेलाचे चटके देऊन तिचा निर्घृण खून केला. चिंचोली औद्योगिक वसाहतीतील धर्मराज नगरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे अख्खे धर्मराजनगर हळहळले. आरुषी ईश्वर वंजारी (५) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अडीच वर्षांपूर्वी गोंदिया येथून ईश्वर वंजारी हा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली पत्नी संगीता, आरुषी (वय-५) आणि अंजली (वय-६) यांना घेऊन चिंचोली औद्योगिक वसाहतीत आले होते. वसाहतीतील धर्मराज नगरात त्यांनी भाड्याने घरही घेतले होते. ईश्वर आणि संगीता एका कारखान्यात काम करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. दरम्यान, याच भागातील शिवाजी भालेराव (३०) याने संगीताबरोबर प्रेमसंबंध जुळविले. सहा महिन्यांपूर्वी शिवाजीने ईश्वरला मारहाण करून तेथून हाकलून दिले. त्यानंतर शिवाजी हा संगीता आणि तिच्या दोन मुलींसमवेत राहत होता. मंगळवारी सकाळी दोघे नेहमीप्रमाणे गॅस कंपनीत कामाला गेले. शिवाजी हा काही वेळाने घरी आला. पुन्हा दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास शिवाजी कंपनीत जाऊन संगीताला घरी आणले. त्यावेळी दोन्ही मुली घरात खेळत होत्या. दुपारी संगीता पुन्हा कामावर गेली तर अंजली खेळण्यासाठी बाहेर गेली.
दरम्यान, शिवाजीने कढईत तेल ओतून ते गरम केले. तेलात चाकू बुडवून आरुषीच्या अंगावर चटके देत होता. बराच वेळ चटके दिल्यानंतर त्याची राक्षसी वृत्ती काही शांत झाली नाही. शेवटी बेलण्याने तिच्या डोक्यावर प्रहार करीत तिचा जागीच खून केला. त्याने मुलीला इतके चटके दिले की मृत आरुषिचे शरीर पूर्णत: काळे-निळे पडले होते. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी शिवाजी भालेराव यास अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 4 = eight