तैपेई– ५३ प्रवाशांना घेऊन जाणारे ट्रान्स एशियाचे प्रवासी विमान बुधवारी सकाळी तैवानची राजधानी तैपेईमधील कीलुंग नदीत कोसळले. या अपघातात २२ जण ठार झाल्याची माहिती तैवानच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अद्याप २१ प्रवासी बेपत्ता आहेत.
तैपेईच्या संघसन विमानतळावरुन ट्रान्स एशियाचे एटीआर ७२ हे विमान किनमेन बेटाच्या दिशेने निघाले होते. यावेळी विमान पुलाला धडकले आणि कीलुंग नदीत कोसळले. या दुर्घटनेतील १५ लोकांना आतापर्यंत सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र इतर २१ प्रवासी तसेच क्रू मेंबर्सबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, अशी माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.
महिन्याभरापूर्वी तैवानच्या ट्रान्स एशिया एटीआर ७२ या विमानालाच अपघात झाला होता. यामध्ये ४८ जण ठार झाले होते तर १० जण जखमी झाले होते.










