मुंबई- अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार पातळीवर याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने शुक्रवारी वानखेडे स्टेडियम येथे नवे मुख्यमंत्री शपथ घेत असताना सरकारचे लक्ष या गंभीर घटनांकड़े वेधण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांनी आक्रमक होत तीव्र आंदोलने केली. यात फेसबुक आंबेडकर राईट मुव्हमेंट (फेम), संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच, रिपब्लिकन सेना, कायद्याने वागा, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकर सेन्टर फॉर जस्टिस एंड पीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएशन ऑफ़ इंजीनियर, नॅशनल फेडरेशन ऑफ़ पेट्रोलियम, एस. सी. एस. टी. एम्पोलीय असोशिएशन आदी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम येथे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होत असताना, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मरीन ड्राइव्ह चौपाटी परिसर, चर्चगेट पूर्व पश्चिम, तसेच वानखेडे स्टेडियमच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात आली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त असताना सुरक्षाला छेद देऊन संघटना कार्यकर्ते सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या साहित्यिक उर्मिला पवार, उषा अम्बोरे, आनंदराज आंबेडकर, राज असरोंडकर, कुंदा प्रमिला निळकंठ, सिद्दार्थ मोकले, रेवत कनिंदे, वैभव छाया, सुमेध जाधव, सुधीर ढवले, सुबोध मोरे, संजय रणदिवे, फिरोज मीठीबोरवाला, अॅड़. संघराज रुपवते, किशोर कांबळे, रेखा कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांची रवानगी येलो गेट पोलिस ठाण्यात आणि मरिन लाइन्य पोलिस ठाण्यात करण्यात आली.










