नवी दिल्ली- खलिस्तानी दहशतवादी देविंदरपाल सिंग भुल्लर याला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करून ती जन्मठेपेवर आणण्याची केंद्र सरकारची शिफारस सर्वोच्च न्यायालयास मान्य केली. त्यानुसार भुल्लरची फाशी रद्द झाली असून ही शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे सप्टेंबर १९९३ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या बॉम्बस्फोटात नऊ जण ठार आणि २५ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर भुल्लरने दया अर्ज दाखल केला होता. मात्र त्याच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा विलंब झाल्याने या प्रकरणात शिक्षा परावर्तित होऊ शकते, असे महाधिवक्ता जी ई वहाणवटी यांनी सरन्यायाधीश सदासिवम यांच्या खंडपीठास सांगितले. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भुल्लरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पी सदासिवम, न्यायमूर्ती आर एम लोढा, न्यायमूर्ती एच एल दत्तु आणि न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यालयात १९९३साली भुल्लर याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात नऊजण ठार झाले होते. याप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षे हा दयाअर्ज राष्ट्रपतींच्या संमतीविना सरकारकडे पडून होता.










