
मुंबई/पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचे सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत मुलींनीच बाजी मारली असून तब्बल ९२.९४ टक्के मुली तर ९०.१८ टक्के मुले दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाली आहेत. राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल ८८.३२ टक्के लागला होता. गेल्या चार वर्षापासून दहावीच्या निकालात निर्माण केलेला ‘कोकण पॅटर्न’चा दबदबा यंदाही कायम असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सर्वाधिक निकालाचा मान राज्यात कोकण विभागाने (९६.५४ टक्के) मिळवला तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८६.३८ टक्के निकाल लागला.राज्यात ४७३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४६ टक्के लागला. यंदा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.









