दिल्लीचा कौल ‘आप’ला- एक्झिट पोल

2015-02-08~3-03_ns
नवी दिल्ली : उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदानाचा कौल आम आदमी पार्टी (आप)च्या बाजूने गेल्याचे भाकीत विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर चाचणी)च्या आधारे वर्तविले.
७० सदस्यीय विधानसभेसाठी ‘आप’ला मिळणाऱ्या संभाव्य जागांच्या आकड्यात तफावत असली, तरी भाजपाला सत्ता मिळणार नाही आणि ‘आप’ला निर्विवाद बहुमत मिळेल, हेच सर्वच्या सर्व एक्झिट पोलमधून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपाची विजयी वाटचाल रोखण्याचे काम राजधानीतील मतदारांनी केल्याचे चित्र निकालापूर्वीच तयार झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत करणाऱ्या एक्झिट पोलपैकी एका चाचणीत ‘आप’ला सर्वाधिक ५३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. वृत्तवाहिन्यांनी शनिवारी दिवसभर दाखविलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजपा हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुठल्याही चाचणीत काँग्रेसला पाचच्या वर जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी निकालानंतर पराभवाचे खापर भाजपात कोणाच्या माथी फोडले जाणार, तसेच अपश्रेयाचा धनी ठरविण्यावरून भाजपात होणाऱ्या संभाव्य सुंदोपसुंदीबद्दलची उत्कंठा वाढली आहे.
कडक बंदोबस्तात मतदान;१० फेब्रुवारीला निकाल
सकाळी ८ वाजता संथगतीने मतदानास प्रारंभ झाला होता. परंतु जसजसा सूर्य डोक्यावर येत गेला तसतसा मतदारांमधील उत्साह सुद्धा वाढताना दिसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. २०१३च्या निवडणुकीत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. २००८ सालच्या ५७.५८ टक्क्यांच्या तुलनेत ते ९ टक्के अधिक होते. या निवडणुकीत सरासरी ६७.१४ टक्के मतदान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three − = 1