दिल्लीत दहा तास भारनियमन
नवी दिल्ली- वीज खरेदीसाठी पैसे नसल्याने दिल्लीतील वीज कंपन्यांनी शनिवारपासून शहरात १० तास भारनियमन करण्याची घोषणा केली. वीज कंपन्यांनी आगळीक केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
बीएसइएस यमुना पॉवर लिमिटेड कंपनीने मध्य व पूर्व दिल्लीत शनिवारपासून १० तासांचे भारनियमन करण्यात येईल असे दिल्ली सरकारला कळवले आहे. एनटीपीसी आणि एनएचपीसी कंपनीकडून वीज खरेदी करण्यासाठी कंपनीकडे पैसे नाहीत. गेल्या काही वर्षापासून वीज उत्पादनाचा खर्च वाढला असून महसूली उत्पन्न कमी झाले आहे. उत्पन्न व खर्चातील महसूली तूट ६२०० कोटी रुपयांवर गेली आहे. बँकांनी नव्याने निधी देणे थांबवले आहे. त्यामुळे सरकारने कंपनीला तातडीने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी बीएसइएस यमुना पॉवर लिमिटेडने दिल्लीचे ऊर्जा सचिव पुनीत गोयल यांच्याकडे केली.दिल्लीत टाटा, अंबानी यांच्या कंपन्या वीज वितरण करतात. मात्र देशात केवळ याच कंपन्या नाहीत. सरकार या क्षेत्रात नवीन कंपन्यांना आमंत्रण देऊ शकते, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.टाटा आणि अंबानी यांच्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अनेक पुरावे आहेत. या वीज कंपन्यांनी भारनियमन केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही दिल्लीत वीज वितरणासाठी अन्य कंपन्यांना आमंत्रण देऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.










