
नवी दिल्ली – दिल्लीत थंडीचा कडाका अद्यापही कायम असून गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी दिल्लीत झाली. रविवारी दिल्लीतील तापमानाचा पारा २.६ अंश सेल्सियसपर्यंत घसरला.
कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे ३५५ विमाने तसेच ७० रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला.
सकाळी साडेवाजता दिल्लीत २.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वातावरणात ९७ टक्के आर्द्रता होती तर ५० मीटर अंतरापर्यंत दाट धुके पसरले होते, अशी माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली. गेल्या पाच वर्षातील तापमानाने गाठलेला हा नीचांक आहे. २६ डिसेंबर १९४५ मध्ये दिल्लीत सर्वात कमी १.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, असे अधिका-यांनी सांगितले.
दाट धुक्यामुळे दिल्लीतील हवाई तसेच रेल्वेवाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. ५५ विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे. तर तीन आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर ७० रेल्वेच्या वाहतूकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सहा रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.









