
नवी दिल्ली- आदर्श घोटाळ्याप्रकरणी भारतीय परदेशी सेवेत असलेल्या देवयानी खोब्रागडे आणि उत्तम खोब्रागडे यांच्यावर सीबीआय आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. आदर्श सोसायटीमध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर घेतल्याप्रकरणी त्याच्यावर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार खोब्रागडे यांनी खोटी माहिती सादर करून घर मिळवल्याचे पुरावे सापडले आहेत. माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे हे म्हाडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याप्रकरणी चौकशी करणा-या सीबीआयने २५ जणांच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. आदर्श सोसायटीमध्ये या २५ जणांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर मिळवल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आदर्श सोसायटीमधील १०२पैकी २५ घरे ही बेकायदेशीर असल्याचे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे.ए.पाटील यांच्या समितीच्या अहवालात म्हटले आहे.









