
बालासिनोर – भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी त्यांच्या तथाकथित विकासाचा आणि ढोंगीपणाचा बुरखा जनतेसमोर फाडला. नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या राजवटीसारखी राजवट गुजरातमध्ये मोदींकडून चालवली जात असून भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या बाता मारणा-या मोदी यांच्याच मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या वस्तुस्थितीकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. मोदी यांनी यापूर्वी केलेल्या भाषणांमधील मुद्यांचा राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात जोरदार समाचार घेतला.
गुजरातमध्ये कोणत्या प्रकारची चौकीदारी(पहारा) सुरू आहे, असा सवाल त्यांनी जनतेला केला. शेतक-यांची लाखो एकर जमीन त्यांच्यापासून हिरावून घेऊन ती उद्योगपतींच्या घशात घातली जाते. या विरोधात जेव्हा शेतकरी आवाज उठवतात, तेव्हा त्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले जाते, असे राहुल गांधी म्हणाले. शेतक-यांच्या जमिनी हिसकावून घेणा-या रखवालदाराची गरज नाही तर जनतेला त्यांचे हक्क हवे आहेत असा टोला त्यांनी लगावला.गुजरातमधील विकास हा फक्त मोजक्या लोकांपर्य़ंतच मर्य़ादित राहिलेला आहे. मात्र हा विकास गरीब जनतेपर्य़ंत पोहोचलेलाच नाही. काँग्रेसने माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक मंजूर केले आहेत. मात्र या विधेयकांना भाजपकडून विरोध केला जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. गुजरातच्या विकासाचे श्रेय कोणा एका व्यक्तीला जात नाही तर ते तेथील जनतेला जाते, असेही त्यांनी सांगितले.









