
सिडनी- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी दणदणीत पराभव केला. वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला आफ्रिकेने अवघ्या ३३ षटक आणि एका चेंडूत १५१ धावांमध्ये गुंडाळले.
डीविलियर्सच्या नाबाद १६२ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५१ धावांवर गारद झाला. ख्रिस गेल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सॅमी ०५ धावा केल्या. तर सिमन्स आणि रसेल शून्यावर बाद झाले. बेन अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जे टेलर १५ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, झंझावती फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डीविलियर्स याने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये १६२ धावांची तुफान खेळी साकारली. तर आमला, प्लेसी, रोसॉ यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ५० षटकांत ५ बाद ४०८ धावांचा डोंगर उभा केला. आमला (६५), डू प्लेसी (६२) तर रॉसॉने केवळ ३९ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.









