द.आफ्रिकेचा १४६ धावांनी विजय

AP3_12_2015_000009B
वेलिंग्टन -कर्णधार एबी डेविलियर्सच्या (९९), बेहरादीनच्या (६४) आणि मिलरच्या (४९) धावांच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा विजयपथावर आणले. वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएईवर १४६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ठेवलेले ३४२ धावांचे लक्ष्य गाठताना यूएईचा संघ १९५ धावांत गारद झाला.
भारताकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर द. आफ्रिकेने वेस्ट इंडिज आणि आर्यंलडचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत द.आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत द.आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर साजेशी कामगिरी करत यूएईविरुद्ध विजय साकारला.
सामन्यात नाणेफेक जिंकून यूएईने द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. द. आफ्रिकेनेही प्रथम फलंदाजीचा फायदा उचलत ५० षटकात ३४१ धावा केल्या.
बेहरादीनच्या तुफान फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला डोंगराऐवढे लक्ष्य उभारता आले. बेहरादीन आणि फिललँण्डरने शेवटच्या तीन षटकात ४९ धावा कुटल्या. बेहरादिनने अवघ्या ३१ चेंडूत नाबाद (६४) धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार ए.बी.डेविलियर्सचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. (९९) धावांवर खेळत असताना कामरान शेहझादच्या गोलंदाजीवर डेविलियर्सने अमजद जावेदकडे झेल दिला.
आजच्या सामन्यात १७ धावांवर हाशिम आमलाच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला हादरा बसला. मोहोम्मद नावेदने त्याला अमजद अलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डिकॉकने रोसाऊच्या साथीने डाव सावरला. डिकॉकने (२६), रोसाऊने (४३) धावा केल्या. त्यानंतर डेविलियर्स आणि मिलरमध्ये चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. मिलर अर्धशतकापासून एक धाव दूर असताना बाद झाला.
द. आफ्रिकेने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करणा-या यूएईच्या संघाला १९५ वर रोखण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले. यूएईच्या स्वप्नील पाटीलने ५७ धावांची झुंजार खेळी केली. तर शायमन अन्वरने ३९ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक ६३ धावांची भागीदारी रचली. या दोघा खेळांडूंव्यतिरिक्त बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरल्याने यूएईला पराभवाची नामुष्की टाळता आली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + = six