
दिग्रस, दि. २ – घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दहा लाखाची धाडसी चोरी केल्याची घटना तालुक्यातील धानोरा (खु) येथे घडली. शेषराव रामचंद्र राठोड यांच्या घरी ही चोरी झाली. भरदुपारी १२ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दुपारदरम्यान शेषराव राठोड यांच्या घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून अंदाजे तीन ते चार लाखाची रोकड, सोने, चांदीचा ऐवज असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. दुपारी १२.३० वाजता राठोड शेतातून घरी आले असता घरी चोरी झाल्याची घटना त्यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांचे अवसानच गळून पडले. या घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.









