जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक, बसस्थानकावरील पेट्रोल पंपाची तपासणी
यवतमाळ दि. ८ : आर्थिकदृष्ट्या कमकूवत तसेच गरजू लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने स्वस्त दरात विविध योतजेअंतर्गत अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या वितरण व्यवस्थेत गैरप्रकार आढळल्यास संबंधीतांची गय न करता कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाळकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.काळे, सहाय्यक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्री.देशमुख यांच्यासह परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.नारायण मेहरे, नगरसेविका ज्योती खोब्रागडे, प्रा.केशव चेटुले, प्रा.राजेंद्र ठाकूर, नरेश पालारवार, अशोक उमरतकर, हितेश सेठ, भारत चव्हाण, गणपत काळे, बळवंत ठाकरे आदी उपस्थित होते. अन्नधान्य वाटपात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रारी केल्या पाहिजे. अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. साखर वाटप व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या वाटपावर बारकाईने लक्ष देण्याचा सुचना केल्या. ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्यांनी वितरण व्यवस्था सुरळीत सुरु राहवी म्हणुन सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले. बैठकीत जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच गॅस एजेंन्सीकडून विविध वस्तुंच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काही पेट्रोलपंपाना भेटी देवून तपासणी करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार यवतमाळ बसस्थानकावरील दोनही पेट्रोलपंपांवरील आवश्यक सुविधा व ग्राहकांना योग्यप्रमाणात पेट्रोल दिले जात आहे का याची पाहणी केली. या पाहणीत काही त्रुट्या आढळून आले अ सून त्याप्रकरणे संबंधीतांना नोटीस बजावण्यात येणार आहे.










