
नवी दिल्ली , दि. ११ (विशेष प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी उधळताच संसदेत एकच गदारोळ झाला. कॉँग्रेसच्या खासदारांनी या विधानाला आक्षेप घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली.
या विधानावर जोरदार आक्षेप घेताना कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसैन दलवाई म्हणाले की, गोडसे यांना देशभक्त संबोधण्याचा प्रकार म्हणजे त्यांचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे हे वक्तव्य करणा-या व्यक्तीस तात्काळ अटक झाली पाहिजे.
जगाला अहिंसेची शिकवण देणा-या राष्ट्रपिता गांधीजींची हत्या गोडसेने केली होती. अशी बेफाट वक्तव्ये करणा-या व्यक्तींच्या विरोधात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. या प्रश्नावर सरकार गप्प का असा सवाल त्यांनी केला.









